उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर ह्या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, शालेय क्रीडा स्पर्धांचा आयोजन, तसेच क्रीडा आणि युवकांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवणे समाविष्ट आहे.
क्रीडा हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा मार्ग नसून, तो शिस्त, आत्मविश्वास, चिकाटी आणि नेतृत्वगुण यांचे प्रतिक आहे. खेळातून मिळणाऱ्या अनुभवांमुळे युवकांना जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते. याच कारणामुळे महाराष्ट्र शासनाने क्रीडाविकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागपूर विभागातील क्रीडा व युवक सेवा विभाग म्हणून आम्ही खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहोत. आमच्या विभागाद्वारे ५% खेळाडू आरक्षण योजना प्रभावीपणे राबवली जात असून, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ही योजना म्हणजे खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी आहे, जी त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यांकन करते. विभागीय क्रीडा संकुल, नागपूरच्या माध्यमांतून आम्ही गुणवंत खेळाडूंना आधुनिक व सर्वोत्तम दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहोत. आजच्या पिढीतील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक, अद्ययावत क्रीडासाहित्य, वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती आणि स्पर्धात्मक वातावरण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नुकतेच शासनाने विभागीय क्रीडा संकुलास राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा दिला आहे व रु. ६८३ कोटींचा ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ या प्रकल्पाची मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात व पालकमंत्री मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेत विभागीय क्रीडा संकुल समिती, नागपूर मार्फत उभारणी सुरु आहे. मा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय भरणे साहेबांचे विशेष लक्ष या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आहे. आमचा उद्देश केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणे एवढाच नाही, तर युवकांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे हाही आहे. आपण सर्वांनी या संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या कौशल्याने, परिश्रमाने आणि जिद्दीने राज्य व देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, हीच आमची मनःपूर्वक शुभेच्छा!